तरुण मराठा’ला पीएनजी कबड्डी चषक ‘जय मातृभूमी’ला उपविजेतेपद ; ‘राणाप्रताप’ तिसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:17 IST2018-04-29T00:17:52+5:302018-04-29T00:17:52+5:30
हरिपूर : पीएनजी चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळाने धडाकेबाज खेळ

तरुण मराठा’ला पीएनजी कबड्डी चषक ‘जय मातृभूमी’ला उपविजेतेपद ; ‘राणाप्रताप’ तिसऱ्या स्थानी
हरिपूर : पीएनजी चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळाने धडाकेबाज खेळ करीत रोख रक्कम २५ हजाराच्या बक्षिसासह विजेतेपद पटकावले.
तरुण मराठा मंडळ विरुध्द जय मातृभूमी मंडळ यांच्यात अंतिम सामना झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढत रंगतदार झाली. अनुभवी जय मातृभूमी मंडळाने ‘तरुण भारत’ची बचाव फळी खिळखिळी केली. यापूर्वीच्या स्पर्धेत जय मातृभूमीने तरुण मराठाला नमवले होते. पराभवाचा ‘तो’ वचपा काढण्यासाठी या स्पर्धेत ‘तरुण मराठा’चा संघ चुरशीने आणि ईर्षेने लढला. ‘तरुण मराठा’ने बेधडक चढायांच्या जोरावर जय मातृभूमीला २३-१२ अशा ११ गुणांनी पराभूत करत पीएनजी चषकावर आपले नाव कोरले. ‘तरुण मराठा’कडून विलास पाटील, शुभम पाटील व संदीप यादव यांनी नेत्रदीपक खेळ केला.
या स्पर्धा पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ यांनी पुरस्कृत केल्या असून, पीएनजी सुवर्ण कारागीरांनी आयोजित केल्या होत्या. आयर्विन पुलाजवळील सरकारी घाट येथे विद्युतझोतात हे सामने पार पडले. बक्षीस वितरण जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संयोजक समीर गाडगीळ होते. नितीन शिंदे यांनी स्वागत केले. विजय कडणे व डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले.
आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, माजी नगरसेवक हरिदास पाटील, आंतरराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे यांनी स्पर्धास्थळी सदिच्छा भेट दिली. पंच म्हणून अनिल माने, भालचंद्र जाधव, आलम मुजावर, सुशील गायकवाड, झाकीर इनामदार, विजय देसाई, रवींद्र कोरे, गणेश भस्मे, धनाजी शिंदे, अखिलेश पाटील, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. यावेळी राजू गाडगीळ, विकास कारेकर, मंगेश मुधोळकर, विकास कामटे, गोपी कडणे, सुशांत भुर्के, दत्ताजी गायकवाड आदी उपस्थित होते.
विजेतेपदाचा पीएनजी कबड्डी चषक सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळास रामभाऊ घोडके व समीर गाडगीळ यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन शिंदे, राजू गाडगीळ, हरिदास पाटील, सुहास व्हटकर, अशोक शेट्टी, वेदांत गाडगीळ, राजन खेडेकर, विकास कारेकर आदी उपस्थित होते.